शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘जनसुराज्य’तर्फे सत्कार
मिरज (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. शहरासह गावगाड्यांमध्ये काँक्रीटचे पक्के रस्ते करण्याचे जाहीर केल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
समित कदम म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक चांगल्या गोष्टींचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी’ योजना जाहीर करण्यात आली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. शेतरस्ते आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन योजना प्रस्तावित आहे. शेतमजुरांचा आता अपघात विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून आगामी वर्षांत २५ लाख महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. यासह अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत.” त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.


