मनपा शाळा क्रमांक ३६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
शाळेला सर्व भौतिक सुविधा व बस उपलब्ध करून देऊ – उपमहापौर गजानन मगदूम
मिरज (प्रतिनिधी)
विवेकानंद सोसायटी, कुपवाड रोड येथील सांगली महानगरपालिका शाळा क्रमांक ३६ चा वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची प्रभावी झलक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लावणी, समाजप्रबोधनपर नाटक, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत विविध राज्यांतील गीते, तसेच हिंदी-मराठी रिमिक्स गीते आणि कथा सादर करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
यावेळी बोलताना मनपाचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचे कौतुक केले. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मेहनत घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच शाळेसाठी बस सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान नगरसेवक विष्णू माने, नगरसेविका मीनाक्षी पाटील व नगरसेविका योगिता राठोड यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमास सदाशिव पाटील, आशुतोष धोत्रे, प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर, विशाल भोंडवे, अशोक नागरगोजे, रेश्मा ढेरे, संगीता फडतरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनिता गोरड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन घोदे यांच्यासह पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीन सनदी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले, सुमन फडतरे आणि रोहिणी रेनके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर ढेरे यांनी केले.


