मिरजेतील महात्मा गांधी उद्यानातील अस्वच्छतेवर शिवसेना(उबाठा)चा इशारा; प्रवेशद्वार तात्काळ उघडण्याची मागणी
मिरज (प्रतिनिधी)
येथील लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून बंद असलेले उद्यानाचे प्रवेशद्वार तात्काळ सुरू करावे, तसेच परिसरात स्वच्छता व औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आले असून मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराणा प्रतापसिंग चौक, मिरज येथील महात्मा गांधी उद्यानाचे प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या उद्यानात लहान मुले खेळण्यासाठी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. मात्र सध्या निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करावी आणि उद्यान नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवाय उद्यानाच्या शेजारी तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते. त्यामुळे या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उद्यानाचे प्रवेशद्वार दि. १८ मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे खुले करून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने महानगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांनी दिला आहे. मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शकीरा जमादार, शहर समन्वयक फिरोज मुलानी, उपशहर प्रमुख सूरज डावरी, सचिन कोरे, उमेश आयरेकर, संदीप शिंदे, मंथन कुंडेकर यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


