घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा ; मिरज सुधार समितीचा आक्रमक पवित्रा

0
848489

मिरज (प्रतिनिधी)
गेल्या पंधरा दिवसांपासून अमेरिका-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने व्यवसायिक गॅस वितरण पुर्णपणे थांबविले आहे. तर, घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केल्याने याचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक व त्यांचे कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रित तुटवडा निर्माण करुन घरगुती गॅस दुप्पट दराने व्यवसायिक वापरासाठी काळाबाजार करीत असल्याचे चित्र आहे. म्हणून प्रशासनाने यात गांभिर्याने लक्ष देऊन कृत्रिम गॅस टंचाई व काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांवर कारवाई करण्यासाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गुरुवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, अशोकसिंग रजपूत, सुरेश झेंडे, शब्बीर बेंगलोरे, राजेश पाटील, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, उदय सखदेव, अय्याज पठाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अर्पणा धुमाळ यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, अमेरिका-इराण युध्दाची काळी छाया आपल्या भारतीय अर्थ व्यवस्थेवर होत आहे. केंद्र व राज्य सरकारने व्यवसायिक गॅसचा पुरवठा पुर्णपणे थांबविला आहे. तसेच, घरगुती गॅस वितरणावर काही अटी व नियम लागू केले आहेत. सरकारने उचलेल्या या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक व कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम शहरातील सर्वच गॅस वितरण कार्यालयावर गॅस नेण्यासाठी सर्वसामान्यांची रांगा लागत आहेत. सर्वसामान्यांची लुट होत आहे. तर, व्यवसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर असा गैरप्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. प्रशासनाने घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या गॅस वितरक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच, घरगुती गॅस वितरण प्रणाली व्यवस्थित कार्यान्वित करण्याबाबत योग्य ते उपाययोजना करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *