एमटीडीके शैक्षणिक संकुलात ‘करिअर टॉक शो’ उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा मिळावी या उद्देशाने एमटीडीके शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ““एमटीडीके करिअर टॉक शो” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. परमशेट्टी (वैद्यकीय तज्ज्ञ), फारुख कोतवाल (वकील व न्यायाधीश), राकेश दड्डनावर (सामाजिक कार्यकर्ते), शिवाजीराव मोहिते (पत्रकार) आणि सुनील देशपांडे (अभियंता) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रवास, शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी, तसेच यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांबाबत उत्सुकता दाखवत अनेक प्रश्न विचारले. मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांना योग्य दिशा दिली. या संवादात्मक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का चव्हाण, सोनाली भानुसे, भूमी पवार आणि सुबोध जमदाडे या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी सांगितले की, अशा शाळाबाह्य उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील अनुभव समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचे व्यवहारी ज्ञान वाढते आणि भविष्यातील करिअर निवडताना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रांविषयी जिज्ञासा निर्माण झाली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.


