महिला सक्षमीकरण हाच प्रगत समाजाचा पाया – प्रा. स्मिता केरीमाने
मिरज (प्रतिनिधी)
येथील कन्या महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या प्रा. स्मिता केरीमाने यांनी मार्गदर्शन करताना “स्त्री केवळ घराचा आधार नसून समाजाच्या प्रगतीचा मुख्य कणा आहे. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब आणि देशाची प्रगती होते,” असे प्रतिपादन केले.
माजी विद्यार्थी संघ, महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने प्रगती करणाऱ्या श्रीमती शोभा प्रभाकर पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनिता माळी यांनी करून दिला, तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य उल्हास माळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शबाना हळंगळी यांनी केले व आभार वनिता पवार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


