सांगली हादरली, पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या

0
WhatsApp Image 2026-03-19 at 3.03.39 PM

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजय प्रभाकर परांजपे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक असलेले परांजपे हे पलूसमधील कुंडल वेस परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार, परांजपे हे रात्री आपल्या कुटुंबासोबत घरी बसले होते. काही वेळाने ते इमारतीखालील मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी खाली जाऊन पाहिले असता, त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. हे भीषण दृश्य पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

हल्लेखोरांनी पूर्वनियोजन करून पाळत ठेवत हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरात जाताना किंवा परत येताना त्यांना गाठून हे कृत्य करण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच कुंडल वेस परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते. संजय परांजपे हे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या हत्येने शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून, लवकरच गुन्ह्याचा छडा लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परांजपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पलूस शहर शोकसागरात बुडाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *