शाहूवाडी तालुक्यात कृषी मार्गदर्शन मेळावा उत्साहात
जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील मार्गदर्शन करताना
सरूड (प्रतिनिधी) भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा कणा आहे. अनेक संकटांना सामोरे जात शेतकरी खंबीरपणे उभा राहत असतो. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी केले.
पंचायत समिती शाहूवाडी कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रियंका भोसले होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील म्हणाले की, शाहूवाडी तालुका हा ग्रामीण व डोंगराळ भागात विखुरलेला असून येथे शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना बळकटी मिळणार असून त्यांच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बांबू लागवड आणि प्रगत शेतकरी ही संकल्पना आमदार डॉ. विनय कोरे यांची असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
उपसभापती अमर खोत व गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनीही मनोगते व्यक्त केली. मेळाव्यात बांबू रिसर्च फाउंडेशनचे पाटलोबा पाटील यांनी बांबू लागवडीविषयी मार्गदर्शन केले, तर निवृत्त पशुधन विकास अधिकारी श्रीकृष्ण भट यांनी आधुनिक कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला सभापती प्रियंका भोसले, जि. प. सदस्य स्नेहल वेल्हाळ, पंचायत समिती सदस्य अमरसिंह चौगुले, डॉ. धनश्री जाधव, लक्ष्मी पाटील, माधुरी पाटील, सुरेश पवार, तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे, कृषी अधिकारी अंकुश गोरे, शिवाजी काशीद, पर्यवेक्षक संदीप शेळके, विस्तार अधिकारी बाजीराव गायकवाड, अंकुश शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या. यावेळी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


