मिरजेत स्वच्छता दूतांचा आगळावेगळा सन्मान

0
IMG_6557

नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांच्या संकल्पनेतून पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम

मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून मिरजेतील पद्मावती शांती सेवा फाउंडेशनच्या वतीने सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील स्वच्छता दूतांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्वांसाठी सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना नगरसेविका अपर्णा शेटे म्हणाल्या, “स्वच्छता कर्मचारी हे शहराचे खरे आरोग्यदूत आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविला आहे. भविष्यात त्यांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येईल. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहू.”

या कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, भाजप नेते सुरेश बापू आवटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश देशमाने, नगरसेवक मोहन वाटवे, दयानंद खोत, विवेक (बंडू) शेटे, महादेव नलवडे, सुनील चप्पलकट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रभाग ४ मधील स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत फाउंडेशनचे आभार मानले. शहराची स्वच्छता अधिक जोमाने आणि सातत्याने राखण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *