मिरजेत ‘मी सावित्री बोलतेय…’ या एकपात्री प्रयोगाने शाहू व्याख्यानमालेची दिमाखात सुरुवात

0
1001569393

“२४ वर्षांपासून समाजाला दिशा देणारी व्याख्यानमाला”- विनायक यादव

मिरज (प्रतिनिधी)
येथील माजी सैनिक सोसायटी परिसरात सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहू व्याख्यानमाले’च्या २४ व्या वर्षाची उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या पुष्पात प्रसिद्ध वक्त्या वैष्णवी गजेंद्र जाधव यांनी ‘मी सावित्री बोलते’ या प्रभावी एकपात्री प्रयोगातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनप्रवास जिवंत केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज व संस्थापक कै. प्रा. अशोक पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. आपल्या सादरीकरणातून जाधव यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व, सनातनी प्रवृत्तींचा विरोध आणि महात्मा फुले यांच्या सहकार्याने दिलेला लढा प्रभावीपणे मांडला. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हा विचार अधोरेखित करत आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अध्यक्षस्थानी उद्योजक विनायक यादव होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी या व्याख्यानमालेच्या सातत्यपूर्ण वाटचालीचा गौरव करत, “ही व्याख्यानमाला गेली २४ वर्षे समाजाला योग्य दिशा देण्याचे, प्रबोधन घडविण्याचे आणि सकारात्मक विचारांची रुजवात करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बदलत्या काळातही सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचे आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम या व्याख्यानमालेतून सातत्याने होत आहे,” असे मत व्यक्त केले. यावेळी किशोरी पाटील, मिलिंद पाटील, अशोकभाऊ पाटील कोकळेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. भारत पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *