राष्ट्रीय लोकअदालतीत साडेतीन हजार प्रकरणे निकाली ; १३ कोटी ५५ लाख रूपये दंड वसूल

0
IMG-20260511-WA0359

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष अदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पार पडली.

या लोकअदालतीत दावापूर्व ३१७३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली, तर विविध न्यायालयांतील ४३९ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ३६१२ प्रकरणे निकाली निघाली. यामधून तब्बल १३ कोटी ५५ लाख ५९ हजार ७६२ रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी दिली.

लोकअदालतीदरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून वेळ व खर्च वाचविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा न्यायाधीश-२ एस. एम. चंदगडे, जिल्हा न्यायाधीश-३ एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश-५ एम. एम. पाटील, कौटुंबिक न्यायाधीश एस. जे. घरात, दिवाणी न्यायाधीश एन. के. पाटील, ए. आर. कल्हापुरे, व्ही. व्ही. खुलपे, पी. के. करवंदे, जे. एस. मकानदार, ओ. एस. शास्त्री तसेच निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकात माने, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे तसेच अनेक पॅनेल ॲडव्होकेट उपस्थित होते.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या प्रमाणात पक्षकारांचा सहभाग लाभल्याने लोकअदालत प्रभावीपणे पार पडली. पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *