रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग, सांगलीच्या ‘चेअरमन’ पदी सौ. संगीता प्रशांत पाटील यांची निवड
पुरोगामी विचाराचा वारसा असलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा सन्मान
कोल्हापूर, (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग, सांगलीच्या ‘चेअरमन’ पदी सौ. संगीता प्रशांत पाटील यांची निवड ही एका अर्थी पुरोगामी विचाराचा वारसा असलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा सन्मान होय. रयतच्या दक्षिण विभागाच्या पहिल्या महिला चेअरमन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने पदाची उंची वाढवतात, अशाच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या सौ. संगीता वहिनी यांची ही निवड त्यांच्या निस्पृह सेवाभावाचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा यथोचित गौरव आहे.
उच्चविद्याविभूषित सौ. वहिनींचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पाचगणीच्या प्रसिद्ध ‘इरा स्कूल’मधून शालेय शिक्षणाचे बाळकडू घेतलेल्या वहिनींनी विलेपार्ले येथील साठे कॉलेजमधून संख्याशास्त्र व गणित यांसारख्या आव्हानात्मक विषयात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. पुढे जेट एअरवेजच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असतानाही, त्यांनी आपली सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी कधीही ढळू दिली नाही. अनेक व्यावसायिक शिखरे पादाक्रांत करताना त्यांनी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपले.
विशेषतः गेल्या पाच वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. रयत शिक्षण संस्थेबरोबरच इस्लामपूरच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून काम करताना, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात यश मिळवून देण्यासाठी त्या सदैव धडपडत असतात. यासोबतच छत्रपती शिवाजी विद्यालय (विलेपार्ले) येथे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (कोल्हापूर) येथे महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन म्हणून त्यांनी त्या शाखांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रयतचे मार्गदर्शक जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील. मा. सरोज (माई) पाटील, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. यशवंतराव थोरात यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली वहिनी आपले शैक्षणिक, सामाजिक व पुरोगामी कार्य अधिक सक्षमपणे पुढे नेत आहेत. अशा या कर्तृत्ववान आणि बहुजन कल्याण विचारांचा वारसा लाभलेल्या नेतृत्वाकडे आता रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग, सांगलीच्या ‘चेअरमन’ पदाची जबाबदारी आल्याने, या विभागाच्या शैक्षणिक प्रगतीला एक नवी दिशा आणि गती मिळेल यात शंका नाही. त्यांच्या ह्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर यांच्यावतीने महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो डॉ. डी. आर. भोसले यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


