लोड शेडिंगमुळे शेतकरी त्रस्त; सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचे महावितरणला निवेदन
मिरज (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील वारंवार होणारे लोड शेडिंग, अनियमित व कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला असून, या समस्या तातडीने सोडवून शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गट व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या मिरज तालुका व परिसरातील ग्रामीण भागात वारंवार लोड शेडिंग होत असून, अनेक ठिकाणी अनियमित व कमी दाबाने वीजपुरवठा केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. सध्या शेती हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सततची वीज कपात आणि रात्री-अपरात्री दिला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसभर वीज नसल्याने मोटारपंप बंद राहतात. परिणामी ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्री उशिरा वीज आल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत असून, सर्पदंश, अपघात तसेच वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. याशिवाय कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्मर निकामी होणे अशा समस्याही वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या वतीने ग्रामीण भागातील अनियमित लोड शेडिंग तात्काळ बंद करावे, शेतीपंपांसाठी नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, दिवसातील ठराविक वेळेत वीज देण्याचे नियोजन करावे, खराब ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वसूचनेसह उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडे, विजयतात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, इस्माईल कुरणे, प्रदीप सावंत, अजित शेजुळ, तुषार खांडेकर, संजय लिंबीकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सकपाळ, समशेर नदाफ, डॉ. अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संकपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


