सेवासदन फाउंडेशनच्या ‘सायकल बँक’ उपक्रमातून १० गरजू विद्यार्थिनींना सायकली; ‘पालावरची शाळा’ सुरू
मिरज (प्रतिनिधी)
सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन, मिरज यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल बँक’ उपक्रमांतर्गत १० गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात फाउंडेशनच्या ‘पालावरची शाळा’ या उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी प्रास्ताविकात सायकल बँक उपक्रमाची माहिती देताना गेल्या सात वर्षांतील संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते बाळासाहेब गायकवाड यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असे सांगितले.
डॉ. रविकांत पाटील यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला. वड्डी व यशवंतनगर येथील शाळांमधील १० गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षकांच्या उपस्थितीत सायकली देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शाळेपर्यंतच्या प्रवासातील अडचणी कमी होऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
यानंतर कृपामाई परिसरालगतच्या झोपडपट्टीतील वंचित मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पालावरची शाळा’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. शिक्षणापासून दूर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला अडसुळे दाम्पत्य, संस्थेचे विश्वस्त, हितचिंतक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी कोळी यांनी, तर आभार गोविंद जोशी यांनी मानले.


