मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: २ लाख ३५ हजारचे १४ मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द
मिरज (प्रतिनिधी)
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधण्याच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत सुमारे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात दिले.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत केले.
आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल सुरक्षितपणे परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांच्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.


