मिरज बसस्थानक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २४ जणांना घेतले ताब्यात
मिरज (प्रतिनिधी)
येथील बसस्थानकासमोरील हॉटेल मयूर ताजच्या बोळात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपाणी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळविणाऱ्या तिघांसह एकूण २४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकला. यावेळी संदीप पंढरीनाथ सातपुते (रा. उदगाव वेस), खाजा कलंदर शेख (रा. ईदगाह मैदान) आणि मयूर गायकवाड (रा. कोल्हापूर चाळ) हे तिघे इतरांकडून पैसे लावून तीनपाणी पत्त्यांचा जुगार खेळवित असल्याचे आढळून आले. त्यांच्यासह जुगार खेळणारे अन्य २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, पत्त्यांचे संच व जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा सुमारे ६ हजार ५४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व संशयितांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन बिराजदार यांच्यासह शक्ती पोकळेकर, सचिन काकडे, राहुल गोसावी, सचिन ऐवळे, किरण पुजारी आणि मिलिंद पाटोळे यांनी सहभाग घेतला.


