मिरजेतील आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये बेंदूर सण उत्साहात
मिरज प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेला शेतकऱ्यांचा पारंपरिक ‘बेंदूर’ सण आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी बैलांची विधिवत पूजा केली. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग लावून, फुलांच्या माळा घालून, पायांवर गुलाल लावून त्यांचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बैलांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे तसेच समन्वयक विश्वासराव पाटील यांनी बैलांचे पूजन करून शेतकरी आणि शेतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या बैलांप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच भारतीय कृषी संस्कृती, परंपरा आणि श्रमाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने शाळेत दरवर्षी बेंदूर सण साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बेंदूर सणावरील पारंपरिक गीते सादर केली. तसेच बैलांचे शेतीतील महत्त्व, शेतकऱ्यांचे योगदान आणि कृषी संस्कृती जपण्याची गरज यावर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


