केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशी उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची संस्कृती जिवंत केली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. प्राजक्ता पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विठ्ठल-रखुमाई, वारकरी आणि संतांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी साकारलेली रूपे विशेष आकर्षण ठरली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हार्डी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. वारकरी परंपरेतील समता, सेवा, भक्ती आणि सदाचार या मूल्यांचे जतन करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
या प्रसंगी प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येळकर उपस्थित होत्या. तसेच शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त ॲड. वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची जवळून ओळख झाली असून, सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि जाणीव अधिक दृढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.


