मिरजेत आ. इद्रिस नायकवडी यांच्या पुढाकारातून रविवारी महाआरोग्य शिबीर ; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

0
WhatsApp Image 2026-07-27 at 10.41.19 PM

मिरज (प्रतिनिधी)
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी मिरज येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली. रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मिरज हायस्कूल येथे हे शिबिर होणार आहे.

आ. इद्रिस नायकवडी वैद्यकीय मदत कक्षातर्फे या शिबिराचे संयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आ. नायकवडी यांनी केले आहे. नगरसेवक अतहर नायकवडी, महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राधिका हारगे, ईश्वर जनवाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मेहता हॉस्पिटल, मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल, अरिन हॉस्पिटल, सेवासदन हॉस्पिटल, शेख ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आर्यन कार्डियाक हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दोरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री मॅटरनिटी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतदादा पाटील रक्तपेढी, शासकीय रुग्णालय रक्तपेढी आदी वैद्यकीय संस्था तसेच ५० गुण अधिक तज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.

याबाबत आ. नायकवडी यांनी माहिती दिली की, या शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यातील गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पुढील शस्त्रक्रिया व मोफत उपचार केले जाणार आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली की, संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या मिरज शहराला अधिकाधिक उत्तम प्रगतशील व दर्जेदार सुविधा असलेले बनवून, विविध प्रकारच्या शासकीय योजना सक्षमपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एक पाऊल आपल्या आरोग्यासाठी या हेतूने महाराष्ट्र तसेच देशात व परदेशात उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात प्राविण मिळवलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य व वैद्यकीय तपासणी तसेच शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *