बेळंकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने बेळंकी (ता. मिरज) येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, सांगली शहर जिल्हाध्यक्षा स्वाती सुशांत खाडे, जिल्हा प्रभारी मंजिरी गाडगीळ आणि पश्चिम मंडळाच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांचा शेती उपयोगी साहित्याने ओटी भरून सन्मान करण्यात आला. तसेच नैसर्गिक, सेंद्रिय व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक शेती तज्ज्ञ विजय वरुडकर आणि रवींद्र कुलकर्णी यांनी मातीचे आरोग्य, उत्पादनवाढ, सेंद्रिय शेतीतील संधी आणि आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे देत शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेत्या सुमन खाडे, गीतांजली ढोपे पाटील, ज्योती कांबळे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच परिसरातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम महिला सक्षमीकरण, कृषी जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. उपस्थितांनी अशा विधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


