बेडग-बोलवाड मार्गावर भीषण अपघात; तरुण पशुवैद्यकीय सल्लागाराचा जागीच मृत्यू

0
WhatsApp Image 2026-07-28 at 10.13.10 PM

मिरज (प्रतिनिधी)
बेडग-बोलवाड मार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सुभाषनगर (ता. मिरज) येथील आकाश केशव खोत (वय २९) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. व्हॅगनार कारच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या आकाश यांना समोरून येणाऱ्या स्कूल बसची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आकाश खोत हा एका नामांकित कुक्कुटपालन कंपनीमध्ये खाजगी पशुवैद्यकीय सल्लागार म्हणून कार्यरत होता. बेडग, आरग आणि परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांना कुक्कुटपालनासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम तो करायचा. सोमवारी कामानिमित्त बेडग येथे आला असता सायंकाळी दुचाकीवरून सुभाषनगर येथील घरी परतत असताना बेडग-बोलवाड मार्गावर त्याच्या दुचाकीला एका भरधाव व्हॅगनार कारने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे आकाश रस्त्यावर फेकले गेला. त्याचवेळी समोरून येणारी स्कूल बस त्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घटनास्थळीच मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण आणि संबंधित वाहनचालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आकाश खोतच्या पश्चात पत्नी, दीड वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. अल्पवयातच काळाने घाला घातल्याने सुभाषनगरसह बेडग-आरग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *