ई-बाईक चार्जिंगच्या वादातून सबस्टेशन ऑपरेटरचा निर्घृण खून ; अवघ्या पाच तासांत पोलिसांनी उकलले हत्याकांड
मिरज (प्रतिनिधी)
मिरज-सांगली रोडवरील कृपामयीजवळील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या ऑपरेटरचा खून झाल्याची धक्कादायक घटना २९ जुलै रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या पाच तासांत दोन आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल केली.
सुधीर पंडित लाटवडे (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे मयत ऑपरेटरचे नाव आहे. या प्रकरणी सौरभ संतोष निकम (वय २३, रा. एमएसईबी रोड, बेडग) आणि विनायक विक्रम सावंत (वय २२, रा. दुधगाव रोड, बागणी, ता. वाळवा) यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी कि, आरोपी सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे मेस्को कंपनीमार्फत संबंधित सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. २९ जुलै रोजी सायंकाळी सुधीर लाटवडे आणि संतोष निकम यांच्यात इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगवरून वाद झाला. त्यानंतर संतोष निकम यांना कामावरून कमी करण्यात आले. या घटनेचा राग मनात धरून संतोष यांचा मुलगा सौरभ निकम आणि त्याचा साथीदार विनायक सावंत हे रात्री दुचाकीवरून सबस्टेशनमध्ये गेले. ऑपरेटर रूममध्ये घुसून दोघांनी सुधीर लाटवडे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लोखंडी रॉडने वार केले. गंभीर जखमी झालेल्या लाटवडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऑपरेटर रूममध्ये रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच लाटवडे यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.
महात्मा गांधी चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करून अवघ्या पाच तासांत दोन्ही आरोपींना अटक केली गेली. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.


