मिरज पंचायत समितीच्या इमारतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ; आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून इमारतीचे नामकरण
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला गुरुवारी (दि. ३०) तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारत” असे नामकरण केले. सकाळी सुमारे नऊ वाजता हा कार्यक्रम पार पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कार्यक्रमात बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, सलगरेचे विद्याधर कांबळे, अरविंद कुरणे, उमेश धेंडे, सागर आवळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सर्वदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नामकरणानंतर नव्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
याप्रसंगी सचिन कांबळे यांनी सांगितले की, पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची तालुक्यातील शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. प्रशासनाकडे मागणी करूनही ती मान्य होणार नाही, असा विश्वास नसल्याने कार्यकर्त्यांनी स्वतःच नामकरण केल्याचा दावा त्यांनी केला. पुढील काळात या नामकरणाचा अधिकृत ठराव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नामकरणाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू होते. मात्र प्रशासनातील कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी सायमोते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या नामकरणाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.


