अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेदरम्यान बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी

0
WhatsApp Image 2026-07-31 at 1.35.28 PM

अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाचे सहकार आयुक्तांना निवेदन
सांगली (प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६च्या अंमलबजावणीदरम्यान राज्यातील विविध भागांत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण, धमक्या आणि गैरवर्तनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ (एआयबीओसी) महाराष्ट्र राज्य युनिट-१च्या शिष्टमंडळाने सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक डॉ. दीपक रामचंद्र तावरे (भा.प्र.से.) यांची भेट घेऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात कर्जमुक्ती योजनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणाऱ्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणे, हल्लेखोरांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला स्पष्ट सूचना देणे, बँकांची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करणे तसेच प्रभावी समन्वय व तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

शिष्टमंडळात कॉ. प्रमोद शिंदे (राज्य सचिव, एआयबीओसी महाराष्ट्र राज्य युनिट-१), कॉ. अल्ताफ मुलानी (अध्यक्ष, सेंट्रल बँक अधिकारी संघटना), कॉ. धोंडीराम गायकवाड (सरचिटणीस, युनियन बँक अधिकारी संघटना), कॉ. शंकर खैरनार (अध्यक्ष, स्टेट बँक अधिकारी संघटना महाराष्ट्र मंडळ), कॉ. विश्वास वेताळ, कॉ. ऋषिकेश, कॉ. गौरव निगडे, कॉ. रोहित तसेच कॉ. निलेश पवार (वरिष्ठ उपाध्यक्ष, एआयबीओसी) यांचा समावेश होता.

यावेळी डॉ. दीपक तावरे यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी समन्वय राखला जाईल, असे आश्वासन दिले. कॉ. निलेश पवार म्हणाले, कर्तव्य बजावत असलेल्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारावे. तर कॉ. प्रमोद शिंदे म्हणाले, बँक अधिकारी शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करतात, धोरणे ठरवत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणे अयोग्य असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व सन्मानासाठी एआयबीओसीचा लढा पुढेही सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा