‘सेवासदन’ चा ८ वा वर्धापनदिन उत्साहात

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान
मिरज (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा ८ वा वर्धापन दिन १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सांगली मिरज रोडवरील निसर्गरम्य सेवासदन गार्डनमध्ये संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सेवासदनचे चेअरमन डॉ. रवीकांत पाटील, डॉ. मलगोंडा पाटील, डॉ. सरोजिनी पाटील, डॉ. साक्षी पाटील, डॉ. दीपा पाटील, श्री योगेश पाटील, डॉ. अमृता दाते व सीओओ श्री चिराग मार्टिन यांच्यासह सेवासदनचे अन्य मान्यवर डॉक्टर्स, सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. दीपा पाटील यांनी केले. यानंतर प्रमुख अतिथी डॉ. दिगंबर शिर्के यांचा सेवासदन च्या वतीने डॉ. रवीकांत पाटील, डॉ. मलगोंडा पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ना. डॉ.दिगंबर शिर्के यांचा परिचय सॅमसन मोहिते यांनी करून दिला. डॉ. डी.टी. शिर्के यांनी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथून पदवी (१९८५) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या संख्याशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण (१९८७) पूर्ण केले. १९८७ मध्ये सीएसआयआर संशोधन फेलोशिप मिळवून त्यांनी संख्याशास्त्र विभागात संशोधन सुरू केले आणि १९९० मध्ये विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००५ ते २०१५ या कालावधीत ते संख्याशास्त्र विभागप्रमुख होते. दिनांक ०७/१०/२०२० साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. तसेच यावेळी डॉ. साक्षी पाटील यांनी सेवासदन ग्रुप ऑफ हेल्थ केअरच्या अकॅडेमिक्स विभागाबद्दल माहिती दिली व कुमारी मीनाक्षी कोळी यांनी सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या कार्याबद्दलची माहीत दिली.
यावर्षी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये जयवंत कोंडविलकर (ज्येष्ठ समाजसेवक), डॉ.आनंद पांडुरंग कुलकर्णी ( सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ ), श्रीमती निर्मला कांबळे (ज्येष्ठ परिचारिका), राकेश दड्डणावर (विशेष सेवा पुरस्कार सामाजिक) व श्रीमती रमाबाई रेड्डी (ज्येष्ठ स्वच्छता कर्मचारी) यांचा डॉ. दिगंबर शिर्के यांच्याहस्ते या मान्यवरांचा पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
जयवंत कोंडविलकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय सॅमसन मोहिते यांनी करून दिला. कोंडविलकर यांनी बालपणापासून संघाच्या माध्यमातून मेघालय सारख्या ठिकाणी जाऊन, तेथे राहून केलेल्या कामाची चित्रफीत देखील दाखविण्यात आली. आपल्या सत्काराला उत्तर देताना कोंडविलकर यांनी देशसेवा हा संघाचा मुख्य उद्देश असून राष्ट्र प्रथम हे ध्येय असून त्या दिशेने आयुष्यभर वाटचाल सुरु ठेवल्याचे सांगितले. सेवासदन च्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले कि, गेल्या सात वर्षांत सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने केवळ आरोग्य सेवा देणारी संस्था म्हणून काम केले नाही, तर समाजासाठी जीवनवाहिनी म्हणूनही खूप प्रयत्न केले आहेत. या भागातील असंख्य व्यक्तींवर यशस्वी उपचार केले आहेत. सर्वोत्कृष्ट स्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी सुविधा असल्यामुळे सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील आरोग्य क्षेत्रात सेवासदनने वेगळा ठसा उमटवला असून विश्वासार्हता निर्माण केली आहे. रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्यंत कुशल वैद्यकीय टीमने २४X ७ अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेवासदन व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवनवीन कोर्सेस सुरु केले गेल्यास त्याचा निश्चित समाजास उपयोग होईल व यासाठी विद्यापीठाची नेहमीच सहकार्याची भूमिका राहील असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना सेवासदन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रविकांत पाटील म्हणाले कि, गेली सात वर्षे ” सेवासदन “मधील आम्ही सर्व डॉक्टरांनी व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून मिरज सांगली व कुपवाड तसेच पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व रुग्णांना आपुलकी व काळजीने बरे करण्याचा प्रयत्न केला. लाखों रुग्णांना आतापर्यंत सेवा देणाऱ्या आमच्या सेवेचे दालन म्हणजेच सेवासदनला सर्वांचा विश्वास जिंकता आला याचा मला अभिमान आहे. आभार प्रदर्शन कुमारी सविता जगताप यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सॅमसन मोहिते व श्रद्धा पवार यांनी पार पाडले.