एन.एस.एस. शिबीर हे संस्कार रुजवणारे व्यासपीठ – तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ

एरंडोली येथे कन्या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
मिरज (प्रतिनिधी)
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवन अनुभवता येते, नेतृत्व गुण, शिस्त, श्रमदान, सामाजिक भान इत्यादिंची जाणीव होते. शिबिरातून मिळालेली ही शिदोरी आयुष्य सकारात्मक रीतीने जगण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे एस.एस.एस. श्रमसंस्कार शिबीर म्हणजे संस्कार रुजवण्याचे व्यासपीठ असते, असे प्रतिपादन मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले. मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाकडील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, सलगरेच्या लोकनियुक्त सरपंच जयश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य बी.के.पाटील, सचिन पोतदार, आत्माराम जाधव, सुप्रिया तवटे, सचिन तवटे, विद्यासागर चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कन्या महाविद्यालयाचे रासयो विशेष श्रमसंस्कार शिबीर तालुक्यातील एरंडोली या गावी दि. १८ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाले. सातदिवसीय शिबिराचे उदघाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शिरीष चव्हाण यांचे हस्ते व दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सचिव राजू झाडबुके, पोलीस निरीक्षक अजित सिद उपस्थित होते. शिबिरात स्वयंसेवकाकडून श्रमदान, ग्रामस्वच्छता, प्रबोधन फेरी, प्लॅस्टिक व ई-कचरा संकलन, विद्यार्थी व महिलांसाठी स्पर्धा असे उपक्रम राबविले गेले. नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सुमारे 100 हुन जास्त गावकऱ्यांनी याचा लाभ घेतला. गोळा केलेला ई-कचरा व प्लॅस्टिक पृथ्वी फौंडेशन या सेवाभावी संस्थेला पुर्ननिर्मितीसाठी देण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे ‘छत्रपती शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टीकोन आणि सद्यस्थिती’, अँड. फारूक कोतवाल यांचे ‘सायबर सुरक्षा’, प्रगतशील शेतकरी रमेश खंडागळे यांचे ‘नाविन्यपूर्ण शेती: काळाची गरज’, सुप्रसिद्ध कवी आबा पाटील यांचे ‘माझी कविता : माझं जगणं’ अशा विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध नाट्य कलाकार वैष्णवी जाधव यांच्या ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण देखील गावकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख, डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. रमेश कट्टीमणी, डॉ. बाबासाहेब सरगर, डॉ. संतोष शेळके, प्रा. क्षितिज जाधव, प्रा. पूजा कांबळे, रासयो प्रतिनिधी श्वेताली पाटील, मंदाकिनी भांगरे, उज्वला माने यांनी परिश्रम घेतले. ग्रामपंचायत एरंडोलीच्या सरपंच वासंती धेंडे, उपसरपंच शिवगोंडा पाटील, फळ मार्केट सभापती बाबगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जाधव, सचिन पोतदार व इतर सर्व सदस्य, कृष्णा पाटील, यांच्यासह जि. प. शाळेचा शिक्षकवृंद, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांचे बहुमोल सहकार्य लाभले.