केंब्रिजच्या विद्यार्थ्यांची मिरजेत फाटक वृद्धाश्रमाला भेट ; विद्यार्थ्यांसाठी हृदयस्पर्शी अनुभव

मिरज (प्रतिनिधी)
येथील ब्राह्मणपुरी परिसरातील फाटक वृद्धाश्रमास संयोगीता पाटील केंब्रिज स्कूलच्या इ.७ वी मधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी भावनिक आणि शिकण्यासारखा ठरला. या वृद्धाश्रमात १३ जेष्ठ नागरिकांची जबाबदारी निभावणारे सामाजिक कार्यकर्ते नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी येथील रहिवाशांच्या दैनंदिन दिनक्रमाविषयी माहिती दिली तसेच त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
विद्यालयाच्या वतीने, विद्यार्थ्यांनी आवश्यक खाद्यपदार्थांचे योगदान देत जेष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला. हा लहानसा प्रयत्न वृद्धाश्रमातील लोकांसाठी आनंददायी ठरला. या भेटीचा विद्यार्थ्यांवर खोल प्रभाव पडला. एका विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आजी-आजोबांचे महत्त्व तिला या भेटीद्वारे प्रकर्षाने जाणवले. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि उपस्थित सर्वांच्या मनाला हा क्षण स्पर्शून गेला. ही भेट विद्यार्थ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करणारी ठरली. भविष्यात असे वृद्धाश्रम असण्याची गरज भासू नये, कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, अशी आशा या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, समन्वयक लुदिया सावनूर तसेच वर्गशिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत वृद्धाश्रमाला भेट दिली आणि जेष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला.