मिरजेत शनिवारी नव-निर्वाचित आमदार-खासदार यांचा सत्कार

सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजातर्फे आयोजन
मिरज (प्रतिनिधी)
अलिकडेच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सांगली जिल्ह्यातून विजयी झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचा सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवारी १ मार्च रोजी मिरजेत O२ पार्क येथे सायं.५ वा. भव्य सत्कार होणार आहे. या सोहळ्यास विधानसभा सभापती राहुल नार्वेकर पाहुणे म्हणून तर प्रभाकर पेशवे (चित्रकूट मध्यप्रदेश), श्रीमंत पुष्करसिंह पेशवे (पुणे) आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे यजमानपद मिरज संस्थानचे राजे श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन राजेसाहेब मिरज यांनी स्विकारले आहे.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या ब्राह्मण संघटना आणि ब्राह्मण पोटजातीच्या संघटना एकत्रीत येवून सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज असे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून गेली दोन वर्षे अनेकविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत यावर्षी संस्थेतर्फे जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार खासदारांना गौरवण्याचे ठरवण्यात आले आहे. मान्यवर पाहुणे व सत्कारमूर्ती यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून निमंत्रण दिले असून सर्वानीच या उपक्रमाचे स्वागत करत निमंत्रण स्वीकारले आहे. समारंभास जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा असे संयोजकानी आवाहन केले आहे.