भरतमुनी स्मरण दिनानिमित्त संस्कार भारती मिरजच्या वतीने आयोजित “रसानुभूती” कार्यक्रम उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
संस्कार भारती पश्चिम प्रांतातील मिरज महानगर समितीने भरतमुनी स्मरण दिनानिमित्त आयोजित केलेला नृत्य संगीत आणि नाट्य यांचा समावेश असलेला रसानुभूती हा कार्यक्रम मुक्तांगण सभागृह, मिरज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाट्य कलाकार आणि दिग्दर्शक तसेच आकाशवाणी केंद्र अधिकारी श्रीनिवास जरंडीकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
प्रथम ओंकार शिखरे आणि कु.श्रावणी देशपांडे यांनी संस्कार भारती ध्येय गीत म्हणले. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, भरतमुनी प्रतिमा पूजन आणि नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ॲड.सचिन हंडीफोड यांनी प्रास्ताविकामध्ये संस्कार भारतीचे कार्य आणि भरतमुनी संबंधी माहिती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर श्री.सुहास दिवेकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला आणि समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जरंडीकर यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्राबद्दलची माहिती थोडक्यात दिली तसेच मिरज शहरास नाट्य,संगीत नगरी म्हणून जो लौकिक आहे तो वृद्धिंगत करण्यासाठी काही मोलाच्या सूचना केल्या. स्वरदा शिखरे आणि गायत्री वझे व त्यांच्या सहकलाकारांनी आपल्या कथ्थकनृत्यांमधून गणेश वंदना,दुर्गा स्तुती आणि तोडी या रचना सादर केल्या. मिरज समितीच्या नाट्यविधा डॉ.पूनम देवल यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन नाटिका सादर केल्या गेल्या. अष्टावधानी अहिल्यादेवी या नाटिकेत डॉ.सौ.विद्या गोसावी,सौ.वर्षा कुलकर्णी,दिपाली जाधव आणि हेमंत गोखले यांनी भूमिका केल्या. दुसरी नाटिका ऋत्विक गोसावी लिखित देहांतप्रायश्चित्त यात मयुरेश जोशी, मिलिंद कुलकर्णी,ॲड.सचिन हंडीफोड आणि आदित्य कुलकर्णी यांनी भूमिका केल्या. दोन्ही नाटिका अतिशय प्रभावीपणे सादर केल्या गेल्या.
ॲड.सी.जी.कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि शेवटी पसायदान सौ.प्रिया जोशी यांनी गायले. कार्यक्रमास प्रांत सह महामंत्री श्री.अमित मराठे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी आपटे यांनी केले. प्रांत मातृशक्ती संयोजिका राजश्री शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती अध्यक्ष ॲड.सी.जी.कुलकर्णी, सचिव श्रीधर देसाई, कार्यक्रम प्रमुख सौ.अनघा राजोपाध्ये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रम यशस्वी केला.