कोलकाता येथे डॉ. बी. एस. भोसले यांचा सन्मान

मिरज (प्रतिनिधी)
कोलकाता राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या वतीने आयोजित वैज्ञानिक परिषदेत प्रख्यात होमिओपॅथ आणि लेखक डॉ. बी. एस. भोसले यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. गेली २५ वर्षे होमिओपॅथीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. भोसले यांनी हजारो रुग्णांवर उपचार करत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.
विशेष म्हणजे, डॉ. भोसले यांनी आपल्या होमिओपॅथी अभ्यासाचा प्रारंभ कोलकात्यात केला होता, जिथे त्यांनी डॉ. एस. के. दुबे आणि डॉ. महेंद्र सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. आज, त्याच भूमीवर व्याख्यान देण्याची संधी मिळणे, ही त्यांच्यासाठी एक भावनिक आणि अभिमानाची गोष्ट ठरली असल्याचे भोसले यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोलकात्याच्या या भूमीने मला घडवले, इथेच मी होमिओपॅथीची खरी तत्त्वे शिकलो. आज मी इथे व्याख्यान देत आहे, ही माझ्या गुरूंना अर्पण केलेली गुरुदक्षिणा आहे. हा क्षण केवळ एक पुरस्कार मिळवण्याचा नाही, तर एका विद्यार्थ्याच्या शिक्षक होण्याचा प्रवास आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे अध्यक्ष डॉ. पिनाकिन त्रिवेदी, सदस्य डॉ. आनंद चौधरी आणि आयोजक डॉ. सुभाष सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
होमिओपॅथी आणि अध्यात्म यांच्यातील संबंध उलगडणाऱ्या ‘The Process – Understanding the Man in Miasm’ या त्यांच्या पुस्तकाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या सन्मानामुळे भारतीय होमिओपॅथी क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.