आष्टा नगरपालिकेने टेंडर निविदा प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात करावी:राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पालिकेत अनागोंदी कारभार, गुंडगिरी मोडून काढू :संग्राम जाधव
आष्टा प्रतिनिधी /डॉ. तानाजी टकले
विकासकामांच्या निविदासाठी पालिकेने मुदतवाढ दिली असली तरी पालिकेने ही प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार युवक काँग्रेसच्या वतीने करणार आहोत अशी माहिती वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आष्टा येथील राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. राजारामबापू दूध संघांचे संचालक संग्राम फडतरे, माणिक शेळके, अमित ढोले, ऍड अभिजीत वग्यानी, राजकेदार आटूगडे,प्रमुख उपस्थित होते.
संग्राम जाधव म्हणाले,आष्टा शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या निविदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने दि.१७ मार्च २०२५ अखेर मुदतवाढ दिली असली तरी या निविदेच्या प्रकियेत प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे आला आहे. भाजपच्या पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखालीच ही प्रकिया सुरू होती का असा प्रश्न उपस्थित होतं आहे.आष्टा शहर हे सुसंस्कृत व शांत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही वर्षात शहरात एकाधिकारशाही, मक्तेदारी निर्माण झाल्याचे चित्र आहे. आष्टा नगरपरिषदेवर प्रशासकराज असले तरी भाजपच्यापदाधिका-यांचा अंकुश आहे. नगपरिषदेच्या विविध विकास कामात त्यांचा हस्तक्षेप होत आहे. राज्य व केंद्र शासनाकडून कामे होत असली तरी कामे मीच आणली आहेत, असा दिखावा केला जातोय.
आष्टा नगरपरिषदेच्या वतीने शहरात वार्षिक रस्ते विकास नफा तोटा निधी योजनेच्या माध्यमातून बोळ, रस्ता, खडीकरण व कॉकीटीकरण या कामांची निविदा प्रक्रिया मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी राबविण्यात येत होती. यावेळी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणा-या ठेकेदार मक्तेदार यांच्यावर संबंधित भाजपच्या पदाधि-याकडून बारीक नजर ठेवण्यात येत होती. त्यांना प्रक्रियेमध्ये भाग घेवू न देणे, धमकीचे फोन करणे अशा प्रकारे दबावतंत्राचा वापर करण्यात येत होता. त्या संदर्भातील माहिती घेण्यासाठी मी, अमित ढोले, महेश पाटील, दत्तात्रय मस्के, राजकेदार आटुगडे नगरपरिषदेत गेलो असता ठेकेदार यांना निविदा फॉर्म संपल्याचे सांगणे त्यांना फॉर्म न देणे असा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले.
आमच्या समोरच एका ठेकेदाराच्या निविदा फॉर्म भरण्यात येत होता त्याने निविदेची बयाणा रक्कमही भरली मात्र याचवेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रविण माने नगरपरिषदेत आले व त्यांनी आमच्याकडे पाहत शिवीगाळ सुरू केली. यावेळी दोघामध्ये धक्काबुकी झाली. त्याने स्व:ताचे पाळलेले गुंड बोलावून संबंधित ठेकेदाराची कागदपत्रे चोरून नेण्याचा प्रकार आमच्यासमोर केला. याबाबत नगरपरिषदेचे अधिकारी यांना आम्ही जाब विचारला संबंधित निविदा प्रकिया रद्द करून पुन्हा ऑनलाईन प्रकिया राबविण्याची मागणी केली. ती मागणी मान्य करून नगरपालिका अधिका-यांनी संबंधित प्रकियेला ५ दिवस मुदतवाढ देत पुर्ण प्रकिया पारदर्शी व निकोप राबविण्याची ग्वाही दिली आहे. संबंधित प्रक्रिया पोलिस संरक्षणात पारदर्शीपणे राबविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
माणिक शेळके म्हणाले,पालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत झालेल्या विकास कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी युवक राष्ट्रवादीच्या वतीने करणार आहोत. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव, माजी संचालक माणिक शेळके, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.अभिजीत वग्याणी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, धनगर समाजाचे युवा नेते अमित ढोले,माजी नगरसेवक सतीश माळी,राजकेदार आटुगडे, शरद आटुगडे, महेश पाटील, सुदर्शन वाडकर, समीर लतीफ, विनोद कोरे, दत्तात्रय मस्के,ओम मालगावे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.