डॉ. प्रकाश पाटील दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

मिरज (प्रतिनिधी)
यशवंत शिक्षण संस्थेच्या मिरज महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिशा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खा. विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
प्रा. डॉ. प्रकाश पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी विषयाचे पीएचडी गाईड म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्यांचे शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रातील कार्य विचारात घेऊन त्यांना या क्षेत्रातील गौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.