“बा”रायगड परिवार आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १२७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आष्टा प्रतिनिधी :डॉ. तानाजी टकले
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून बा रायगड परीवार सांगली विभाग व आष्टा शहरातील विविध सामाजिक संस्था व गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महिला रक्तदात्याही या शिबिरात सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रात “बा” रायगड परिवारामार्फत राबवल्या जाणाऱ्या संवर्धन मोहीमांचे फोटो प्रदर्शन करुन रक्तदात्यांना गडकोट संवर्धन कार्यांचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, युवा नेते अमित ढोले, महेश पाटील, विनायक भोई, राजकेदार आटुगडे, धनाजी जाधव, दत्तत्राय मस्के, विश्वाजित पाटील, प्रमोद आटुगडे, बा रायगड परिवाराच्या वैशाली सोनवणे, अमित जामदार, सत्यजित पवार, सौरभ महाडिक, धनाजी जाधव, अक्षय शिंदे, जीवन काळोखे, अभिजित गोरे, प्रतीक पवार उपस्थित होते. शिबीराचे उद्घाटन संग्राम जाधव अमित ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
अमित ढोले म्हणाले,आष्टा शहराने सदैव पंचक्रोशीत सामाजिक कार्यात प्रभावशाली छाप पाडली आहे.शहरात प्रथमच अनेक सामाजिक संस्था व गणेश मंडळ यांनी एकत्रितपणे असा उपक्रम घेतला , ही बाब अतिशय आदर्शवत आहे. राजकेदार आटुगडे म्हणाले, बा रायगड परीवार गेली अनेक वर्ष सातत्याने गड संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. 55 ते 60 गडकिल्ल्या वरती संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर समाजीक कार्यात बा रायगड परिवार सहभागी असतो. बा रायगड परिवाराच्या वतीने आष्टा शहरांमध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. यामध्ये 127 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजीक बांधिलकी जपली.आभार धनाजी जाधव यांनी मानले.