आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांनी कृषी विषयक ज्ञानाने समृध्द होवून परतावे

0
agry

       

जिल्हाधिकारी अमोल येडगे

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आत्माच्या वतीने शेतकऱ्यांच्या बेंगलोर, म्हैसूर येथील शासकीय संशोधन केंद्रांच्या अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ

अभ्यास दौऱ्यातील शेतकरी जिल्ह्याचे ब्रँड ॲम्बेसिडर

दौऱ्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल

कोल्हापूर (प्रतिनिधी) आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकरी नवनवीन शेती प्रयोगाचे निरीक्षण करतील, शेती विषयक जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करुन घेतील, याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल. यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदी करुन घ्याव्यात, प्रकल्पांचे निरीक्षण करावे, तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे सांगून या अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांनी कृषी विषयक ज्ञानाने समृध्द होवून परतावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूर यांच्या वतीने राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यांतर्गत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा दि. 9 ते 13 ऑगस्ट 2025 या 5 दिवसांच्या बेंगलोर, म्हैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्रांमध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे वाहनाला हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) रक्षा शिंदे, करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, विशेष कार्य अधिकारी शरद मगर व संदेश भोईटे तसेच करवीर, कागल, गगनबावडा, पन्हाळा, हातकणंगले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी निघालेले शेतकरी प्रगतशील शेतकरी असून ते जिल्ह्याचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. या दौऱ्यामुळे परराज्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग त्यांना पाहता येतील. तसेच त्यानुसार आपल्याकडे असे तंत्रज्ञान विकसित करता येईल. अभ्यास दौऱ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि हा दौरा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी म्हणाले, 5 दिवसीय होणाऱ्या दौऱ्यामध्ये इंडियन इन्स्टिट्युट फॉर  हॉर्टिकल्चर रिसर्च (आय.आय.एच.आर.) बेंगलोर येथे व सेंद्रीय शेती संशोधन संस्था, म्हैसूर येथे भेट असल्याने याठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी विषयक ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

शेतकऱ्यांना विमान प्रवासाचा अनुभव मिळावा तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, या हेतूने या अभ्यास दौऱ्याचे नियोजन आत्माच्या राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा बाबीमधून करण्यात आले असल्याचे प्रकल्प संचालक (आत्मा) रक्षा शिंदे यांनी सांगितले. 

  कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सर्जेराव पाटील, शरद देवेकर यांनी मनोगते व्यक्त करुन आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौरा आयोजन केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर व प्रशासनाचे आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *