स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी या केंद्राचे उद्घाटन.

कोल्हापूर.ता.२९ प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही केले. या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, क्रीडा मार्गदर्शक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी केंद्रातील सर्व सुविधांची पाहणी करून खेळाडूंशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंचे नवे युग सुरू होत आहे. हे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीला नवी उंची देण्यासाठी सज्ज आहे. येथील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासह दुखापत व्यवस्थापन, पुनर्वसन आणि खेळातील तांत्रिक विश्लेषण शक्य होईल. मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत खेळाडूकेंद्रित उपाययोजनांमुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकतील.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी, या केंद्राचे उद्घाटन आणि १६.३५ एकर जागेत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या संकुलात विविध क्रीडा सुविधांचा विकास करण्यात आला आहे, ज्यामुळे खेळाडूंना सर्वांगीण प्रशिक्षणाची संधी मिळेल.

अत्याधुनिक सुविधांचा समावेश
स्पोर्ट्स सायन्स सेंटर पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंना नवी दिशा देणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेले हे केंद्र खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करेल, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल. येथील बायोमेकॅनिकल टूल्स, फिटनेस विश्लेषण उपकरणे आणि रिकव्हरी सिस्टम्स खेळाडूंना त्यांच्या तंत्रात प्रगती करता येतील, दुखापतींची जोखीम कमी होईल आणि जलद पुनर्वसन शक्य होईल. केंद्रात आहारतज्ज्ञ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक मार्गदर्शन देतील, ज्यामुळे खेळाडूंचा शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक विकास साधला जाईल. विशेषतः ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना या सुविधांचा मोठा लाभ होईल, कारण त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि पाठबळ मिळेल. या केंद्रामुळे खेळाडूंची कार्यक्षमता वाढेल, दुखापतींवर मात करणे सोपे होईल आणि आंतरराष्ट्रीय यशाची संधी मिळेल.

हे केंद्र खेळाडूंना तांत्रिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श व्यासपीठ देईल, जे त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल. येथे ट्रेडमिल, सायकल, कार्डिओ टेस्ट्स, बॉडी कॉम्पोझिशन अॅनालायझर, इसो-कायनेटिक स्ट्रेंथ टेस्टिंग, बायोमेकॅनिक्स अॅनालिसिस, स्पायरोमेट्री टेस्ट, सायकोलॉजिकल काउन्सेलिंग, न्यूट्रिशन गाइडन्स, फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन यासह अत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे तांत्रिक विश्लेषण उपलब्ध आहे. याशिवाय, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांच्याद्वारे प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक गरजांनुसार टेस्ट आणि अहवाल तयार केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *