दुहेरी मानाचा तुरा गगनबावड्याच्या शिरपेचात!

नीता पडवळ पाककलेत विजेती कविता जाधव नमुना मांडणीत ठरल्या मानकरी
गगनबावडा. (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात गगनबावड्याच्या महिलांनी आपली ताकद दाखवून दिली. सांगशीच्या नीता सुनील पडवळ यांनी पाककला स्पर्धेत उत्तेजनार्थ तर रानभाजी नमुना मांडणी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले. तर कातळीच्या कविता प्रकाश जाधव यांनी रानभाजी नमुना मांडणीत तृतीय क्रमांक मिळवून गगनबावड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तालुक्यातील महिला शेतकरी गटांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, गगनबावड्याच्या नावाला जिल्हास्तरावर मानाचा दर्जा मिळाला आहे.
महोत्सवात तब्बल ४५० रानभाजी पदार्थ आणि ३६० नमुने मांडले गेले. पाककला स्पर्धेत १२७ महिला शेतकरी गटांचा तर नमुना मांडणी स्पर्धेत १५८ महिलांचा सहभाग होता. परीक्षकांनी विजेत्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या महोत्सवात पन्हाळा, गगनबावडा, करवीर आणि भुदरगड तालुक्यातील महिला शेतकरी गटांनी रानभाज्यांचे खर्डा, दही, कोर्ट्याची चटणी, शेंगदाणा चटणी, नाचणी व तांदळाची भाकरी असे पदार्थ विक्रीस ठेवले. एका दिवसात तब्बल एक लाख रुपयांची उलाढाल झाली. शिवाय ८० हजार रुपयांच्या रानभाज्या आणि ५० हजार रुपयांच्या औषधी वनस्पतींची विक्री होऊन शेतकऱ्यांनी वेगळ्या बाजारपेठेची झलक दाखवली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी रानभाज्यांमध्ये वेगळे अर्थकारण निर्माण करण्याची क्षमता असल्याचे सांगून आत्मा व कृषी विभागाच्या भरीव कामगिरीचे कौतुक केले.