माणुसकीशी नातं जपण्याचा माझा प्रयत्न : उदय कुलकर्णी
जुन कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर भिरभिर वाचलच पाहिजे – माणिकराव साळुंखे
कोल्हापूर. (प्रतिनिधी) आपण माणसातल्या माणुसकीपासून फार दूर गेलो आहोत. आपल ईमान माणुसकीशी असावं. आणि हाच प्रयत्न मी आयुष्यभर माझ्या लेखनातून करत आलो आहे. आजही तुम्हा सर्वांना गेल्या वर्षभरापासून मी भेटू शकलो नाही याबद्दल मनात अस्वस्थता होती. ती अस्वस्थता संपवण्यासाठी या प्रकाशन सोहळ्याचा घाट घातला, असे मनोगत उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
देवल क्लब च्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या भिरभिर या पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षर दालन मित्र परिवाराच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. रणधीर शिंदे, अनिल नगराळे आदी उपस्थित होते. यावेळी नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माणिकराव साळुंखे म्हणाले, वैज्ञानिक विचाराचे सजग भान राखून भिरभिर मध्ये आलेले लेख हे सुंदर आहेत. शास्त्राचे अनेक बारकावे उदयनी या पुस्तकात नोंदवले आहेत. हे खरच विलक्षण आहे. आणि ज्यांना जुन कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर भिरभिर वाचलच पाहिजे. विकसित भारत कसा असावा यावर भरपूर राजकीय चर्चा सुरू असतात, पण यातील काही लेखांनी या चर्चेतील सगळी हवाच काढून टाकली आहे. कुणाला तरी आवडेल म्हणून त्यांनी लेखन केलेलं नाही, तर जे काही खर आहे ते लिहिलेलं आहे.
प्रा. रणधीर शिंदे म्हणाले, सलगपणे एखाद्या वर्तमानपत्रात सदर लेखन करणं हे एक आव्हान आहे. अशा स्तंभलेखनात दबाव असू शकतो, पण उदयजीनी या लेखनात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नाचा मागोवा विज्ञानाचे संवेदनशील भान ठेवून घेतला गेला आहे.
यावेळी अनिल नगराळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ रूपा शहा यांनी केले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. यावेळी श्रीराम पवार, अनिल वेल्हाळ, वासुदेव कुलकर्णी, उदय गायकवाड, शैलजा साळोखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


