भूमिपुत्रांच्या उद्योजकतेतून घडेल समृद्ध कोल्हापूर : राजे समरजितसिंह घाटगे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्रस्थापित उद्योजक आणि व्यावसायिकांनी स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग-व्यवसायात संधी दिल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच कोल्हापूर देशातील उद्यमशीलतेचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात आयोजित उद्योजक व पुरवठादारांसाठीच्या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातून देशात कौशल्य विकास आणि उद्योजकतेला नवी दिशा दिली. त्याच धर्तीवर कोल्हापुरात ‘मेक इन कोल्हापूर’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, स्थानिक युवकांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमातून अनेक तरुण यशस्वी उद्योजक म्हणून घडले असून, स्थानिक उद्योगांच्या विकासाला त्याचा मोठा हातभार लागला आहे. कोल्हापूरमधील उद्योजकांनी स्थानिक तरुणांना अधिकाधिक संधी दिल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला निश्चितच गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला बीएनआय अग्नीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीत सत्रा, विवेक राऊत, संदीप हुक्केरी, विनीत जिरगे, अभिजित भोसले आदी उपस्थित होते. बीएनआय अग्नीचे अध्यक्ष अमित राजेनाईक यांनी स्वागत केले, तर विशाल कापडिया यांनी आभार मानले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य
उद्योग-व्यवसायात पारंपरिक अनुभवासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे राजे समरजितसिंह घाटगे यांनी नमूद केले. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल व्यवहार, ऑनलाइन खरेदी-विक्री आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा स्वीकार केल्याशिवाय व्यवसायाला अपेक्षित गती मिळणार नाही. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे उद्योजकच भविष्यातील स्पर्धेत टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


