बिद्री साखर कारखान्याची पहिली उचल विनाकपात रु. ३४५२ जाहीर

0
IMG-20251029-WA0015

बिद्री, (प्रतिनिधी) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन   रु. ३४५२ प्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊसदर  नाही असेही त्यांनी सांगीतले. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

     अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचे दर प्रचंड वाढले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य दर देणे काळाची गरज आहे. बिद्री साखर कारखान्याने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. “ म्हणूनच या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन रु. ३४५२ प्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून हंगाम समाप्तीनंतर शासन नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना अंतिम ऊसदर दिला जाईल. कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आणि सभासद यांचा विश्वास जपला आहे.” 

     ते पुढे म्हणाले, विस्तारिकरणानंतर कारखाना प्रतिदिन ८ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज आहे,  चालू गळीत हंगामासाठी बिद्री साखर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून कार्यक्षेत्रातील गावागावात मजूर टोळ्या व ऊसतोडणी यंत्रे दाखल झाली आहेत. अजून दोन पाऊसाची शक्यता असल्याने रस्त्याकडेच्या ऊस क्षेत्राला तोडी देण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर पुर्ण क्षमतेने ऊसतोड नियोजन केले असून कारखाना व्यवस्थापनाने ठरविलेले १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही  अध्यक्ष श्री. पाटील यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळातील सर्व सदस्य, व्यवस्थापकीय संचालक  आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावर्षी ऊसाची होणारी उपलब्धता किड व रोग तसेच पावसामुळे झालेले नुकसान आणि एकूण हंगाम काळात मिळणारा साखर उतारा सगळ्याचा विचार करता, ऊसाचा अंतिम दर ठरेल, यापुर्वी व यावर्षीदेखील परंपरेनुसार बिद्रीचा उच्चांकी दर कायम राहील. असा विश्वास  के. पी. पाटील, चेअरमन,(बिद्री साखर कारखाना) यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *