आंदोलनादरम्यान मिरज पंचायत समितीत तणाव ; नामकरणाच्या वादावरून घोषणाबाजी
अधिकाऱ्यांकडे धाव घेणाऱ्यांना पोलिसांनी रोखले
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला देण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तसेच प्रशासकीय इमारतीला देण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हटविण्यात आल्याचा आरोप करत आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना एका अधिकाऱ्याच्या वर्तनावरून वातावरण तापले. संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे कार्यालयात नेले. त्यानंतर काही आंदोलकांनी प्रवेशद्वार ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, माजी नगरसेवक सचिन सावंत, शिवसेना (ठाकरे गट)चे तानाजी सातपुते, अशोक कांबळे, कपिल कबाडगे, माजी सभापती सदाशिव खाडे, आकाश कांबळे, रवींद्र कांबळे, प्रमोद इनामदार, विश्वास खांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरू ठेवले.
दुपारच्या सुमारास प्रशासनातील अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आले. यावेळी सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे आणि प्रशासकीय इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कायम ठेवण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. चर्चेदरम्यान एका अधिकाऱ्याने हसत प्रतिक्रिया दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आणि काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत अधिकाऱ्यांना कार्यालयात सुरक्षित हलविले. त्यानंतर काही आंदोलकांनी प्रवेशद्वार ओलांडून कार्यालय परिसरात जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे काही काळ पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
संतप्त कार्यकर्त्याकडून चप्पल फेकण्याचा प्रकार
अधिकारी आणि आंदोलकांमधील शाब्दिक वादानंतर पोलिसांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यालयात हलविले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


