“यश शांतीसाठी न्यू वे” उपक्रमाचे मोफत आयोजन
मनशक्ती प्रयोग केंद्र, (लोणावळा) यांचा उपक्रम
कोल्हापूर,(प्रतिनिधी) – मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा तर्फे मनशक्ती सुवर्ण महोत्सवा अंतर्गत “यश शांतीसाठी न्यू वे” उपक्रमाचे मोफत आयोजन, मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर आणि बुधवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
या उपक्रमात कोल्हापूर मधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना येता येणार आहे, अशी माहिती मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळातर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आली आहे.
या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे. तर यानिमित्त बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.०० वाजता “सन्मान सत्कृत्याचा” हा उपक्रम होणार असून, त्यामध्ये श्यामकमल चँरीटेबव ट्रस्ट(मतीमंदासाठी काम) व उमेद फाउंडेशन (कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम) या दोन सामाजिक संस्थांचा सन्मान डाँ. सुनिलकुमार लवटे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
या संपूर्ण उपक्रमामध्ये ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन, पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र, विद्यार्थी आ णि युवकांसाठी अभ्यास यश मार्गदर्शनपर सत्र होणार आहेत. तर ‘माईंड जिम’ मध्ये उजव्या आणि डाव्या मेंदूच्या विकासासाठीचे विविध प्रयोग, मनाची एकाग्रता, स्थिरता आणि सृजनशीलता वाढवणाऱ्या अॅक्टिव्हिटीज, प्रत्यक्ष हाताळण्याजोगे आकर्षक आणि अभिनव खेळ, तसेच मेंदू विकासाचे घरी घेऊन जाता येतील अशी शैक्षणिक छोटी मॉडेल्स पहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत.
या उपक्रमांतर्गत दोन्ही दिवस सकाळी 8.०० ते रात्री 8.०० या वेळेत अभ्यास यशाचे विज्ञान’, ‘मुलांना घडवताना” दिशा ध्येयपूर्तीची’, ‘शिक्षक सक्षमीकरण’, ‘मत्सरघात परिणाम व उपाय, सुजाण पालकत्व’, ‘आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग’, ‘कौटुंबिक सौख्य आणि शांती, आणि ‘ताण व्यवस्थापन अशा विविध विषयांवर पालक, शिक्षक आणि प्रौढांसाठी मार्गदर्शनपर सत्र होणार आहेत. सर्वांसाठी मोफत खुल्या असलेल्या या उपक्रमाचा लाभ, समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


