निपाणी मतदारसंघातील आरोग्यासह घरकुलसमस्या मार्गी लावा ः सुप्रीया पाटील
निपाणी,ता.22(प्रतिनिधी)-
निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालय अजूनही समुदाय आरोग्य केंद्र आहे. येथे डॉक्टरांच्या कमतरतेसह रुग्णांना अनेक समस्या भेडसावत असून त्या दूर करण्यासाठी या रुग्णालयास तालुका आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, निपाणी शहरवासीयांसाठी पट्टणकुडी माळात सुरू असलेला घरकुल निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावा, अकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा पुरवाव्यात तसेच कुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे यासह विविध मागण्या युवा नेत्या आणि केपीसीसी सदस्य सुप्रिया पाटील यांनी केल्या.
अधिवेशन काळात सुप्रिया पाटील यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली. निपाणी शहरातील साखरवाडी येथील मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचीही मागणी केली.
अल्पसंख्यांक मंत्री जमीर अहमद यांच्याकडे निपाणीतील मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी उर्दू पदवीपूर्व महाविद्यालय मंजूर करावे, अंजुमन बोर्डसाठी अनुदान द्यावे, बेडकीहाळ येथील कब्रस्तान आणि ईदगाह मैदानासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी सुप्रिया पाटील यांनी केली. तसेच अकोळ येथील मरगुबाई मंदिर, बेडकीहाळ येथील अष्टविनायक मंदिर, मरगुबाई मंदिर, विठ्ठल बिरदेव मंदिर, कुर्ली येथील गुरु राजगिरी देवस्थान, तवंदी येथील थळोबा मंदिरासाठी निधी द्यावा तसेच अकोळ येथे 7 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मंजूर करावी, मांगुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.
यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, रामलिंग रेड्डी, दिनेश गुंडूराव, जमीर अहमद, संतोष लाड, आर.व्ही. देशपांडे भैरथी सुरेश, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेऊन निवेदने दिली. याबाबत बोलताना सुप्रिया पाटील म्हणाल्या, वडील दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सदर कामांसाठी संबंधित मंत्र्यांकडे निवेदने दिली होती.पुन्हा एकदा सदर समस्या व कामे संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. यापुढेही या कामांच्या मंजुरीसाठी माजी मंत्री वीरकुमार पाटील आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत, असे सांगितले. यावेळी वायव्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनमण्णावर, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते सुजय पाटील, निपाणी टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, मंजिरी पाटील आदी उपस्थित होते.


