काही वर्षातच पोलिओ हद्दपार होईल ः सुप्रिया जडगे
निपाणी,ता.21(प्रतिनिधी)-
देशातील पोलिओला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आरोग्य संघटना व रोटरी क्लब कार्यरत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात पोलिओ रुग्णांची संख्या अंतिम टप्प्यात आले आहे. समाजात किरकोळ प्रमाणात पोलिओ असला तरी त्याच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने कार्य सुरू आहे. काही वर्षातच पोलिओ हद्दपार होईल, असा विश्वास महिला व बालकल्याण खात्याच्या तालुका अधिकारी सुप्रिया जडगे यांनी व्यक्त केला. निपाणी रोटरी क्लब आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी सभागृहात रविवारी (ता.21) आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष कुरबेट्टी यांनी स्वागत केले. शहर, उपनगरातील 22 केंद्रावर 6300 बालकांना लसीकरण केले.
जडगे म्हणाल्या, पोलिओ लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाच वर्षाच्या आतील बालकांना काळजीपूर्वक ही लस देऊन सहकार्य करावे. मोहीम यापुढे तीन दिवस चालणार आहे. बसस्थानक, घरोघरी, शेतीवाडी, ऊस तोडणी मजूर असणाऱ्या ठिकाणी जाऊन डोस न घेतलेल्या बालकांना पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. रोटरी क्लब अध्यक्ष आशिष कुरबेट्टी, डॉ. संतोष घाणीगेर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. ईश्वर पत्तार, डॉ. प्रणव देशपांडे, रोटरी सचिव चेतन लगारे, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, संजय नंदर्गी, सुजय शहा, वीरेंद्र तारळे, राजेश पाटील, सोमनाथ परमणे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गजाला पठाण, वर्षा नंदर्गी यांच्यासह रोटरी, इनरव्हील क्लबचे सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.


