निपाणी तहसीलदारांवर लोकायुक्तांची धाड
निपाणी, अथणी येथे एकाच वेळी कारवाई
निपाणी ( प्रतिनिधी)
निपाणी तालुक्याचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निपाणीतील रामनगर येथील भाड्याच्या निवासस्थानी तसेच त्यांचे अथणी येथील निवासस्थान असलेल्या ठिकाणी लोकायुक्त पथकाने आज सकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक दोन्ही ठिकाणी छापा टाकून झडती सुरू केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोकायुक्तांच्या पथकाने सकाळी अचानक तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या अथणी येथील तसेच निपाणी येथील भाड्याने राहत असलेल्या रामनगर येथील निवासस्थानी दाखल होत शोधमोहीम सुरू केली. घरातील विविध कागदपत्रे, साहित्य आणि इतर बाबींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, झडतीदरम्यान नेमके काय आढळून आले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लोकायुक्त पथकाची तपासणी अद्याप सुरू असून, कारवाई पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागील नेमके कारण काय, कोणत्या तक्रारीच्या आधारे ही झडती घेण्यात आली आणि तपासात काय निष्पन्न झाले, याकडे निपाणीकरांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदारांची बनावट सही, शिक्का आणि आता लोकायुक्तांची कारवाई
गेल्या महिन्याभरापूर्वी येथील तहसीलदार कार्यालयात एका प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तहसीलदारांच्या बनावट सहीचा व कार्यालयीन शिक्क्याचा वापर केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वतः तहसीलदारांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याची तपासणी अद्याप पूर्ण असतानाच खुद्द तहसीलदारांवरच लोकायुक्तांची कारवाई झाल्याने तहसीलदार कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.


