आपल्या आई-बापाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जीव लावा ः हंकारे

0
IMG-20260214-WA0199

निपाणी,ता.14(प्रतिनिधी)-
आई-बापाचा श्‍वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा, आपल्या आई-बापाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जीव लावा असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले.ते निपाणीतील महादेव गल्ली येथे महाशिवरात्रोत्सव निमित्त शुक्रवारी न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्याप्रसंगी बोलत होते.
हंकारे पुढे म्हणाले, मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे.आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या.त्यांना लाचार करू नका, त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा. तुम्ही आयपीएलचे रन मोजता, त्यांचा हिशेब ठेवता, ज्या आई-बापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगा-खांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे. याचा हिशेब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशेब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल, भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला.या भावनिक व्याख्यानावेळी प्रेक्षक पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
कार्यक्रमासाठी निपाणी मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्ले , माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंदिर कमिटी अध्यक्ष सुनिल पाटील,श्रीमंत दादाराजे निपाणकर, संजय मोळवाडे,अरूण भोसले, हालशुगर संचालिका गीता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *