एकसंबा बीरेश्वर को-ऑप क्रेडिट संस्थेस 51 कोटीचा नफा संस्थापक अण्णासाहेब जोल्ले यांची माहिती

निपाणी(प्रतिनिधी)-
समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास डोळ्यासमोर ठेवून श्री.बीरेश्वर को-ऑप क्रेडिट संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांना चांगला परतावा आणि कर्जदारांना विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सध्या संस्था तीन राज्यात 233 शाखांच्या माध्यमातून व्यापली गेलेली आहे. निस्वार्थी संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी वर्ग, आणि विश्वासू सभासद या माध्यमातून संस्थेची यथोचित प्रगती होत आहे. संस्थेला 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 51 कोटीचा निव्वळ नफा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत हा नफा 5.68 कोटीने म्हणजेच सरासरी 12.54 टक्क्यांनी वाढला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक माजी खासदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

निपाणी येथे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी संस्थेचे प्रधान व्यवस्थापक बहाद्दूर गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थापक आण्णासाहेब जोल्ले पुढे म्हणाले, सर्वांचे सहकार्य व विश्वास या माध्यमातून संंस्था गतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संंस्था रिझर्व बँक आणि केंद्रातील सहकार खात्याच्या नियमानुसार वाटचाल करीत यशस्वी ठरली आहे.संस्थेचे आर्थिक वर्षात 4 लाख 45 हजार 296 सभासद असून भाग भांडवल 37 कोटी 21 लाख 64 हजार200 इतके आहे. यंदाच्या वर्षात 37 हजार 63 इतके सभासद वाढले असून 2 कोटी 29 लाख 47 हजार इतके भाग भांडवल वाढले आहे. संस्थेकडे राखीव व इतर निधी 244 कोटी 25 लाखाचा आहे. संस्थेकडे यंदाच्या आर्थिक वर्षात 5183 कोटीच्या ठेवी असून यंदाच्या वर्षी ठेवीमध्ये 844 कोटींची भर पडली असून सरासरी वाढ ही 19.47 टक्के इतकी आहे. संस्थेने 3838 कोटीचे कर्ज वितरित केल्या असून बँक बॅलन्स व गुंतवणूक 1487 कोटींची आहे. खेळते भाग भांडवल 5839 हजार कोटीचे असल्याचे सांगून संस्थेच्या यशस्वी कार्यात सभासद, ठेवीदार व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब जोल्ले, व्हाईस चेअरमन आनंद पाटील, संचालक सिद्राम गदडे, यासीन तांबोळी, प्रा.विभावरी खांडके, आण्णासाहेब चौगुला, श्रीपाद नेर्लेकर, निंगाप्पा खोकले, काशिनाथ कमते, दत्तात्रय पाटील, काशिनाथ हळींगळी, चेतन देशपांडे, श्रीनिवास कराळे यांच्यासह डीजीएम महादेव मंगावते, रमेश कुंभार, सुरेश माने, शिवपुत्र डब्बा आदी उपस्थित होते.


