सावळीतील विविध प्रश्न तत्परतेने मार्गी लावू – ना. संजय शिरसाठ
मिरज (प्रतिनिधी)
सावळी गावातील दलित वस्ती विकासकामे, संविधान भवन उभारणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या प्रलंबित जागेच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांची त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी सावळी गावातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
मंत्री शिरसाठ यांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक विकासकामे टप्प्याटप्प्याने मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी चेअरमन कुबेर गणे, प्रा. सुधीर शेषवरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे, सोसायटीचे माजी संचालक श्रीपती शिंदे आणि स्वप्नील कांबळे उपस्थित होते.
निवेदनामध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध दलित वस्त्यांमध्ये काँक्रीट रस्ते, भूमिगत गटारी, पथदिवे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात मंत्री शिरसाठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून गृहनिर्माण संस्थेच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.


