कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन करणे अपरिहार्य – रविंद्र माणगावे
तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत.
कोल्हापूर ता.28 (प्रतिनिधी): सध्याचे युग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत. बदल न स्वीकारल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या इतिहासजमा झाल्या. कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन केले नाही तर आपण नामशेष होऊ,” असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी दिला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कारागीर आणि व्यावसायिकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, इमरटेक इनोव्हेशनचे प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव सोमवंशी, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य शेखर घोडके, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे उपस्थित होते.
श्री. माणगावे म्हणाले, “कोल्हापुरी चप्पल ही केवळ परंपरा नाही, तर कोल्हापूरचा जागतिक ओळख निर्माण करणारा वारसा आहे. या वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अत्यावश्यक आहे. चप्पल निर्मितीपासून विक्री पर्यंतची संपूर्ण साखळी डिजिटल माध्यमातून पारदर्शक करणे गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले, “क्युआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन प्रणालीमुळे चप्पलचे मुळ, दर्जा, उत्पादक आणि कारागीर यांची खरी माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहोचेल. या प्रणालीमुळे नकली चप्पलविक्री थांबेल आणि कारागिरांना त्यांच्या कौशल्याचे योग्य मूल्य मिळेल. महाराष्ट्र चेंबर या बदलात कोल्हापुरी उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल.”
महाराष्ट्र चेंबरने आगामी एका वर्षात राज्यातील प्रत्येक गावातून ३६ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. “कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी स्वतंत्र क्लस्टर स्थापन करू, तसेच चर्मोद्योगासाठी कार्यरत असलेल्या लीडकॉम संस्थेशी चर्चा सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडे उद्योगासंबंधी अडचणी सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करू,” असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यशाळेत इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी क्युआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या तंत्रज्ञानामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना होणारे फायदे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविकात जवाहर नगर येथील कातडी कमावण्याचा उद्योग बंद झाल्याने कोल्हापुरी चप्पल साठी लागणारे कातडे दक्षिण भारतातून मागवावे लागते. तसेच सुभाषनगर येथील लीडकॉम चे कार्य पध्दतशीर पणे व पारदर्शक व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले. धनंजय दुग्गे यांनी आभार मानले मानले. प्रशांत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चेंबरचे मानद सचिव जयेश ओसवाल, अजित कोठारी, खजानिस राहुल नष्टे, संचालक शिवाजीराव पोवार, संपत पाटील, अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, अशोक गा.कवाड, शशिकांत व्हटकर, बाळकृष्ण गवळी, शिवाजी माने, मारुती गवळी व इतर उपस्थित होते.


