कोल्हापूरातील रस्त्यांची अवस्था दयनीय नागरिकांची कुचंबना
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था ही सध्या एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना दररोज अपघात, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैदाण झाले आहेत. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलं, वृद्ध आणि रुग्णवाहिका यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्रस्त नागरिकांचा प्रचंड रोष महापालिका प्रशासनावर आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यांच्या दुरवस्थेवर सातत्याने आवाज उठवत आहेत.
जनजागृतीने प्रशासनाला जाग येवूदे शहराचे रस्ते ठीक होऊ देत…..
ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पणत्या लावून आणि रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले. यामध्ये फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवण्यात आली. अखिल भारत हिंदू महासभेने शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात अभिनव आंदोलन केले. यामागे उद्देश होता की खड्डे इतके खोल आहेत की त्यात झाडे लावता येतात, हे महानगर पालीका प्रशासनाला दाखवणे.
काही नागरीकांनी खड्ड्यांमध्ये पोल लावून त्यावर निषेधाचे फलक ठेवले. यामुळे रस्त्यांवरील खड्डे अधिक ठळकपणे दिसू लागले आणि वाहनचालकांनाही सावधगिरी बाळगता आली. काही ठिकाणी नागरिकांनी खड्ड्यांच्या भोवती फुलांची सजावट करून ‘खड्डा महोत्सव’ साजरा केला. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि सोशल मीडियावर थेट प्रसारण करून जनजागृती करण्यात आली, सोशल मिडीयाच्या माध्यमांतून या आंदोलनांना मोठा वाव मिळाल्यामुळे मोठ्या प्रमांणात लोकांची जनजागृती झाली. त्यामुळे मनपा प्रशासनाने व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर नागरीकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शाहूसेनेने ‘हॅपी बर्थडे खड्डे’ आंदोलन करत महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून, कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे..आशा पध्दतीने अनेक व्यक्तिंकडून, सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांकडून विविध पध्दतीने आंदोलन केली जात आहेत असा सर्वांनी आवाज उठवून प्रशासनाकडून काम करून घेणे व मनपाने लोकांना चांगले रस्ते पुरवावेत एवढीच शहरवासींयांची अपेक्षा आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन या प्रभावी अस्त्राचा वापर करुन प्रशासनाला जाग आणण्याचे काम लोक करत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तातडीने पॅचवर्क किंवा दुरुस्तीचे काम सुरू झाले. पण तात्पुरत्या डागडूजीने शहरातील रस्त्यांचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे, लोकप्रतिनिधीनीही भविष्याचा विचार करून दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्यायला हवा.
शहरामध्ये अशी अनोखी, सर्जनशील आंदोलन करून शासनाविरोधात निषेध व्यक्त होत आहे, तर नागरिकांच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचे काम होत आहे. यावर सामाजिक संघटनानी, राजकीय नेत्यांनी न थांबता प्रशासनाकडून दिलेली आश्वासने पुर्ण होत आहेत की नाही याकडे सुध्दा लक्ष दिले पाहीजे.


