मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूरात रस्ते दुरुस्तीची घाई  

0
मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूरात रस्ते दुरुस्तीची घाई

कोल्हापूर. (प्रतिनिधी):  शहरातील रस्ते हा सर्वसामान्यांचा गंभीर प्रश्न आहे. आज शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी महापालिकेला रस्ता  दुरुस्त करण्याची जाग आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करणा-या नागरीकांना अचानक  खड्डेमुक्त रस्ता पाहयला मिळाल्यामुळे नागरिक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. वारंवार तक्रारी करून सुद्धा महापालिका रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

      दरम्यान शिवसेनेच्या बुधवारी झालेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उड्डाण पूल ते मार्केट यार्ड दरम्यानचा रस्ता करण्याच्या दुरुस्तीचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी पूर्ण केले. मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रस्ते चकाचक करण्याचं काम महापालिकेने हाती घेतल्याने लोकांना काहींसा दिलासा मिळाला, असे वारंवार मंत्रीमहोदय कोल्हापूरला यावेत अशीच अपेक्षा या परिसरातील नागरीकांनी व्यक्त केली.

       कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्वाचा मानला जात होता, त्यामुळे  राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने कोल्हापुरातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली. महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या  निकृष्ट कामामुळे अपघातांची शक्यता वाढली होती, त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांनी रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे काही भागांत रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले. पण “केवळ पक्षाचे वरिष्ठ शहरात येत आहेत आणि संभाव्य निवडणूका समोर ठेवून रस्त्याची दुरूस्ती केली असल्याचा सुर नागरीकातून ऐकायला येत होता.

     महापालिकेच्या पूर्वीच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांमध्ये नाराजी होती, त्यामुळे या वेळी कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. राजकीय दौऱ्याच्या वेळी सुरू होणारी दुरुस्ती अनेकदा सोईस्कर स्वरूपाची असते, म्हणजेच ती केवळ बाह्य देखाव्यासाठी केली जाते आणि दीर्घकालीन टिकाव नसतो. स्थानिक नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले पाहिजे. राजकीय दौऱ्याच्या निमित्ताने सुरू झालेली दुरुस्ती ही एक संधी असते, पण ती दर्जेदार रस्त्यांमध्ये रूपांतरित होण्यासाठी पारदर्शकता, गुणवत्ता आणि देखरेख आवश्यक आहे. अन्यथा, ही कामे केवळ तात्पुरती आणि निवडणूकपूर्व तयारी म्हणूनच ओळखली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *